मी हजार चिंतांनी हे,Mi Hajar Chintani He

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !

मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !

डोळ्यांत माझिया सूर्याहूनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !

मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो !!



No comments:

Post a Comment