Showing posts with label M-तेजस चव्हाण. Show all posts
Showing posts with label M-तेजस चव्हाण. Show all posts

स्वातंत्र्याचा लढा झाला SWATANTRYACHA LADA ZALA

बापूजी म्हणाले 'खेडयांकडे चला

चला' म्हणून तर गेले बापूजी, पण फिरकले कोण?

कोण्या बुडूख अंधारात, गुडूप निजलेल्या,

दाटी-वाटीनं बुझलेल्या, बुझून विझून थिजलेल्या,

हिरव्या रानात भिजलेल्या, ठिपक्या ठिपक्या एवढुश्शा

चिमुकल्या खेडयापाडयांकडे फिरकणार तरी कोण?


फिरकली ती एस.टी.! तांबडी माती उडवत,

दिमाखात मिरवत, गावं गावं जोडत,

की गावात शहरं घुसवत.. तिचा लाल पिवळा रंग,

संग शहरांशी करून गेला,

गावालाही चकचकाटाची स्वप्नं तेवढी दाखवून गेला..

झगझगत आली मागून लखलखणारी वीज,

नीज उडवली तिने, गावं उजळवली तिने,

आणला रेडीओही तिने, तिनेच टी.व्ही. दाखवला,

दिपून गेले डोळे,'गाव' दिसेनासा झाला!

झाला झाला खणाणत टेलिफोनचा प्रवेश.. ,

देश जोडला म्हणे त्याने

केला पोस्टाचा भार कमी, ...

अंतरही कमी! केली आतुरता कमी!

म्हणे माणूस जोडला, शब्दाशब्दाने सांधला,

म्हणे दुरावा मोडला की वेळेत तोलला?


झाला गेला सारा बदल... आहे तो असा आहे!

शिक्षणाचं वारं आहे, प्रगतीला उधाण आहे,

लोकल ग्लोबल झालं ओझं संस्काराचं आहे!

गाव कात टाकणारे, गाव नवे होणारे, हिरवे गाणे गाणारे, गाव वेगाने वाहणारे,

हिरवे गाणे गाणारे, गाव वेगाने वाहणारे,

आकाश कवेत घेणारे,

माझ्या मनात मावणारे मला पुकारते आहे...

Lyrics -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKTA GAVHANE
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -डॉ. अमोल कोल्हे DR.AMOL KOLHE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

वाटे... बाकी काही नाही ! WATE ....BAKI KAHI NAHI !

अनवाणी प्रवास...निस्तेज ऊन...
करी लाही लाही...लाही
वाटे... बाकी काही नाही !

फुटक्या खापराच्या तुकडयावर लिहिलेलं पहिलं ग- म - भ -न...
'ग' गणेशाचा की गरिबीचा? ...
ते कधीच न सुटलेलं कोडं !
वेताच्या फोकाचे ते पोटऱ्या फोडणारे
काळे निळे वळ...
आजही शाळेचं नाव काढताच,
काळजात उठणारी तीच कळ !
मैलोन्‌मैल अनवाणी प्रवास,
दगडा-धोंडयात ठेचकाळलेल्या वाटा...
रापलेल्या कातडयावर पसरलेलं ते निस्तेज ऊन...
आठवांच्या नाहीत...
या तर फक्त आसवांच्या वाटा !
वाटे ...बाकी काही नाही !!

उजाड माळरान...वारा बेभान...
आकाशी घार घिरटया घाली...
वाटे... बाकी काही नाही !
तुफान पाऊस...गारांचा नाच...
वाट शांत शांत...खिडकी निवांत..

शेवाळलेल्या सपरात काढलेला,
शहरातला पहिला कुबट पावसाळा...
इथल्या गटारांच्या घमघमाटात,
माझ्या मृद्‌गंधाच्या आठवणीसुध्दा गुदमरून गेलेल्या !
सडक्या भाज्या पाहूनच नुसता जीव घुस्‌मटत राही,
देठांना बरबटलेली मातीच प्यारी,
मला शेतावर घेऊन जाई !
शहर म्हणजे पैशाचा पाऊस,
म्हणे श्रीमंतीचा पूर जिथे !
काबाडकष्टात घामात भिजून,
लोक कोरडे - एकटे जगतात इथे ! ...
वाटे... बाकी काही नाही !!

बोचरी थंडी...शहारा अंगी...
ऊब मायेची...सोबत यावी...
सोबत यावी...
वाटे ...बाकी काही नाही !

गावचा पार... आठवणीच फार !
शहरात बस्तान... माझ्या गावीच समाधान !
खस्ता दोन्हीकडं... तसा आराम कुठंच नाही !
पण प्युरिफायरच्या पाण्याला, आपुलकीची गोडी नाही !!

शिक्षणानं पैसा दिला,...पण शहरानं सुन्न केलंय !
परतीच्या वाटांनाही प्रमोशननं बंद केलंय !!
इथं कडाक्याच्या थंडीत...
स्वेटरच्याही आधी, न चुकता मला चुलंच आठवते...
तशी ऊब कुठंतरी हरवून गेलीए...
आठवण तेवढी जाळत राहाते !

जात दिस दिस जात...ऊन वारा पाऊस...
जिणं जरी कसंनुसं, हो रे माणूस!
वाटे ...बाकी काही नाही...

Lyrics -प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर PRAJAKTA GAVHANE-SHANKAR JAMBHALAKAR
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -सुरेश वाडकर - डॉ. अमोल कोल्हे, SURESH WADAKAR, DR.AMOL KOLHE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

पानझड PANZAD

याही वर्षी पानझड झालीच !
झाडं कशी ओकीबोकी दिसतात नाही !
काळयाशार मेघाला चोच घासत बसणाऱ्या चातकासारखी !
काहीही असो... याही वर्षी पानझड झालीच !

नको वाटते नाही पानझड ! झाडं कशी विद्रूप दिसतात !
लाल पिवळी बावरी फुलं... उगीचंच निखळतात !
पानाफांद्यांचं मेतकूट कसं बरं एका दिवसात फिस्कंटलं?
डवरलेलं मोहक झाड घरटयासकट विस्कंटलं !!

झाडंही उपवास करत असावं !
नसेल, तर निदान तसं दाखवंत तरी असावं !
उगाच का ना हुक्की येते त्याला कफल्लक होण्याची?
का देऊन देऊन दमलेल्या त्याला गरज वाटते थांबण्याची!
धरणीच्या गर्भातून शोषून शोषून ते उत्तर शोधंतच असणार...
आभाळाकडे एकटक बघत हताश मुकाट बसणार !
त्यालाही शिसारी येत असावी... घेणाऱ्याच्या हातांची !
हपापलेल्या, भुकाळलेल्या अस्ताव्यस्त गरजांची !!

मुकं बिचारं निष्पर्ण झाड !!
झडलं असेल वर्षातून कधीतरी...
त्याला तेवढीही मुभा द्यायची नाही?
झाडासारखंच झाड बिचारं... पानंही पानांसारखीच !
सख्य असो वैर असो, "पानझड" आलीच !

Lyrics -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKTA GAVHANE
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -डॉ. अमोल कोल्हे  DR. AMOL KOLHE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERICHI FULE 

माझ्या मनातला गावं MAZYA MANATAL GAV

माझ्या मनातला गावं, सये वडाच्या वेशीत

दोन्ही बाजूंनी डोंगर, घर झाडाच्या कुशीत

आंब्या फणसाची झाडे, माझ्या घराचं कुंपण

दारी अबोली शेवंती, ताटवा फुलला छान

भाव भक्तीचे अंगण, मध्ये तुळशी वृंदावन

सदा सांजवेळी आम्ही तया करितो वंदन

सान पणती तेवते, ठाव काळोखाचा घेते

प्रेम आपुलकी नाते घराघरात नांदते

सगे सोबती बैसोनि गूज प्रेमाचे गाते

सये सांगू तुला कैसे, मन तेथेच रमते


Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALAKAR
Music -तेजस चव्हाण, TEJAS CHAVHAN
Singer -प्रसेनजीत कोसंबी, PRASENJEET KOSAMBI
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२ )KANHERACHI FULE

ही वाट वनातून जाते HI WAT VANATUN JATE

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

स्तब्ध शांतता असेल जेथे
भय कुणाचे नसेल तेथे
इहलोकीच्या सुखचैनीचा
मंद सुवास... मनमौजीचा
झिडकारूनी ते सर्व लयाचे,
आक्रंदण त्या क्रुध्द भयाचे ...
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

पाणंदीतला शीतल वारा
नसेल जेथे स्वार्थी कावा..
'मी' पणाला नसेल थारा
सत्य -शांतीचा असे पहारा !
शस्त्र दुधारी केवळ शब्द
नियती स्तब्ध स्थित प्रारब्ध !
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALKAR
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -बेला शेंडे BELA SHENDE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

तुझा पाऊस वेगळा TUZA PAUS VEGALA

तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!

कण्हेरीच्या फुला,
गावचा पाऊस भारी... बेभान गं सरी!
तडातडा गारा ...शमे तहान गं उरी...
लाड पाऊस करतो ...मला कुशीत गं घेतो !
तळं साचूनी गं वेडा...जागा नौकेला या देतो !

मला एकटा बघुनी...आज घरात गाठूनी,
माझ्या डोळयापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी,
तुझा सांगावा दिला...तोही हळवा झाला...
ऊनचटक्याचा सोस... त्याच्या डोळयात वाचला!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं लळा! . तुझा पाऊसच झळा!!

गावचा पाऊस म्हणे रानीवनी जातो!
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो !
ताल पाऊस धरतो ...माझ्या कौलावरी गातो !
तुझ्या रंगात न्हाऊनी ...मनामनात नाचतो !!

तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप !
व्याप पावसाला किती! ...तुला नदीतीरी ताप !
तुझा नकार घेऊनी... तो गं वळवाचा आला...
अस्सा विरह सोसेना ... तो गं पुरा कोसळला !!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं भोळा ! ...तुझा पाऊस गं चाळा !!

नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!
कण्हेरीच्या फुला,
तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!

Lyrics -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKTA GAVHANE
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -सुरेश वाडकर SURESH  WADAKAR
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२)  KANHERACHI FULE(२०१२)

समाधीवरील फुले SAMADHANAVARIL FULE

अडगळीच्या जागी... अगदी एकांतवासात...
त्या बुरुजाच्या पायथ्याशी... जिथे सूर्य अस्ताचलाला जातोय,
तिथेच... गडाच्या माचीवर,
शांत निवांत पहुडलेली एकुटवाणी समाधी आहे !

मी पांथस्त, जेव्हा त्या वाटेने जातो,
तेव्हा समाधीवरील फुले माझ्याकडे पाहून विस्मयानं हसतात
रानवेलीच्या वेढयाने,
जेव्हा समाधी झाकोळली जाते,
तेव्हा सायंप्रहरीचा वारा
ताटव्यातून त्या फुलांना स्पर्शून हलकेच
खाली खोल दरीत विसावतो

त्या वाऱ्याच्या अल्‌वार झुळकीसोबत
समाधीवरील फुलांची पखरण होते !
नजीकच डवरलेला हा सोनचाफा दिसतोय?
म्हणे त्याच्या बुंध्याशी आजही अगदी निश्चलपणे
तो समाधीतील महापुरूष विसावला आहे !
अनंत दिवसांच्या चिरनिद्रेत !!

पराक्रमाची जेव्हा शर्थ केली होती,
म्हणे रक्ताच्या सडयानेच इथली माती भिजली होती
आज त्याच रक्ताच्या थेंबाथेंबातून
इथे सोनचाफा बहरलाय !
आणि तोही किती इमानी !
नित्य बरसून विराणी गातोय ..
धुळीला मिळालेल्या इतिहासाची !

Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAAMBHALKAR
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

वाडा चिरेबंदी VADA CHIREBANDHI

त्या उजाड माळरानावर...
तळपत्या ऊन्हात... मी नीरस उभा !
जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर,
अंगी पेव निवडुंगाचा !
तरीही लोक म्हणतात,
"वाडा चिरेबंदी बघा!"

किती पिढया इथं पाहिल्या...
सुख दुःखाच्या लाखोल्याही इथंच वाहिल्या!
दशकोन्‌दशकं मीच पाहिलेत वंशावळयांचे अस्त!
कुठे उरलंय माझं रूपडं तरी?
तेही झालंच की जमीनदोस्त!
भेंडयातून उगवणारी रोपं...
आज क्षणिक होईना डवरतात...
ढासळलेल्या पडक्या भींती...
त्याच काय तो पहारा देतात!
पण मी...मी अनंत वर्षांच्या छायेत
शापीत उध्वस्त उभा!
जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर,
अंगी पेव निवडुंगाचा !
तरीही लोक म्हणतात,
"वाडा चिरेबंदी बघा!"

आज 'माझे' म्हणून कोण आहे इथे?
नुसती दुःखाची ग्लानी आणि विरहाची गीते!
सकाळची कोवळी उन्हे शुभ वाटतात ना तुम्हाला?
माझ्या एकांताचा भंग करून डिवचतात ती मला!
या अंधाराच्या गर्तेतून कधीच उठू नयेसं वाटतं
कितीही विसरू म्हटलं तरी नको नको तेच आठवंत रहातं
असली कोरडी कोरडी उजाड सकाळ करपून काढतेय माझी त्वचा!
जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, अंगी पेव निवडुंगाचा !
तरीही लोक म्हणतात,
"वाडा चिरेबंदी बघा!"

सोनसरीची पितळी झिलई, जी कोणेकाळी इथल्या पंगतींनी तृप्त होती,
बोरमाळ-गरसूळ...एवढंच काय, तर पोळयाची झूलही सोन्याने मढलेली होती,
भरभरून वाहणारी ताकाची चरवी अन्‌ वाडाभर भारून उरणारी मनाची श्रीमंती
आज एकाएकी या भग्न कोनाडयांत पार आटून गेलीए
मी एकटाच तेवढा त्या ऋणाईत नेमस्त उभा!
जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, ...अंगी पेव निवडुंगाचा !
तरीही लोक म्हणतात,
"वाडा चिरेबंदी बघा!"

नाही... माझा हट्‌ट नाही, पुन्हा उभं रहाण्याचा!
कडवटलेली भाषा माझी, तुम्ही समजून घेण्याचा!
नकोच तो गुंता, पुन्हा गुंतत जाण्याचा,
लाडकी दुडूदुडू पावलं नजरेदेखत परकी होण्याचा!
नाही, ...नाही उगीच फिरकू नका माझ्याकडे... उपरती म्हणूनसुध्दा!
आता मी शापच देणार तुम्हाला... विरहाचा अन्‌ वार्धक्याचा!
कारण या उजाड माळरानावर..
वर्षोन्‌वर्षे मी तसाच सोसत उभा!
जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, ...अंगी पेव निवडुंगाचा !
तरीही लोक म्हणतात,
"वाडा चिरेबंदी बघा!"

Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -शंकर जांभळकर - प्राजक्ता गव्हाणे PRAJAKTA GAVHANE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

अश्रू ASHRU

मंदिरात गेलो..... फक्त दर्शनासाठी !
बाहेर येताच गराडा पडला...
"काय मागितलं? खरं सांग, काय मागितलंस?"

"काहीच नाही ! सारखं काय मागत राहायचं??"
सरळ साधं उत्तर !
पण छे ! त्यांना पटेल तर शपथ !
तसे हट्‌टी आहेत ते ...
पापणी हातावर घेऊन सतत काही ना काही मागतंच असतात...
कित्ती केवढाल्ल्याला ईच्छा त्या!
पण साऱ्या कशा एकवटून राहिल्याहेत...
फक्त एकाच प्रेरणेकडे !!
असो .

तिथून निघणार ... तो समोर भिक्षुक
चिल्लरचा खणखणाट झाला, तसा तिने हात वर केला
आशीर्वादासाठी !
ना माझा नमस्कार दिसला तिला ...ना पैसा !
तरीही न मागताच दुवा दिल्या तिने
कदाचित लाभतीलही मला त्या !

कोण जाणे?
समोरच्या बुडूख अंधारात,
कित्येक स्वप्नं पाहिली असतील तिने !
साकार होण्यासाठी कदाचित माझ्या नशीबाला
बहाल करू पहात असावी ती...

काहीही असो,
मला मनापासून बरं वाटलं दर्शनाने !
सोबत तिचे शब्दही कानात घुमत राहिलेच,
"काळजी घे !"
दोनच शब्द ..... पण काळजाला भिडले..

रस्ता ओलांडताच अश्रूंचा बांध फुटला
कधीकधी आसवांनाही काही कारण लागत नाही...
हा देव तरी कसा ए ना ... अगदी दाट धुक्यासारखा !
समोरचं नीटसं दाखवतही नाही !
आणि उजाडल्यावर रहातही नाही !!

Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -शंकर जांभळकर - प्राजक्ता गव्हाणे SHANKAR JAMBHALAKAR-PRAJKATTA GAVHANE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२)  KANHERACHI FULE

कण्हेरीची फुले KANHERICHI FULE

आता कुठे हवेत निस्तेजता जाणवू लागलीए !
जेव्हा हवेत उष्ण उन्हाच्या झळा जाणवतात,
तेव्हा परिसर कसा ओकाबोका वाटतो नाही...!

नदीच्या निळयाशार पाण्याचा
काळया पत्थराला जेव्हा स्पर्श होतो,
खळाळत्या पाण्यालाही अवखळ वाऱ्याची साथ लाभते,
हलके हलके नदीभोवती हिरव्याकंच वेलींचे कुंपण पडते,
त्या हिरव्या घनगर्द वनराईत भारून राहिलेला तोच अस्पर्शित गारवा...
माझ्या आसुसलेल्या मनाला,
पुन्हा एकवार तीच गारेगार भुरळ घालतो...

तसा एकाएकी हवेत मंद सुवास दाटतो !
नदीकपारीत लाल-गुलाबी ताटवे फुलारतात ...
उगवतीची कोवळी उन्हे पिऊन,
नदीच्या सुस्त घाट-शीळांवर नीरव विराण पठारांवर,
एकाएकी रंगांचीच उधळण होते !

तसं फारसं कुणी वाट बघत नाहीच त्यांची,
तरीही अचानक येण्यातली गंमत ती मात्र सवयीनं जपतात !

वाट बघणारा विरळाच असतो ... माझ्यासारखा...
त्याला अगदी सुखावून सोडतात ती... नुसत्या दर्शनानं...!

न मागताच जणु उभारी देतात मनाला,
माझ्यासाठीच आल्याच्या थाटात, माझीच होऊन जातात... अतिनाजूक... अगाधसुंदर
कण्हेरीची फुले !!


Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALAKAR
Music - तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKATA GAVHANE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२)  KANHERICHI  FULE (2012