Showing posts with label M-गोविंद पोवळे. Show all posts
Showing posts with label M-गोविंद पोवळे. Show all posts

हरी भक्तिचा भुकेला,Hari Bhakticha Bhukela

हरीभोवती नित्य नाचतो
भक्तांचा मेळा
हरी भक्तिचा भुकेला

पहाटसमयी जात्यावरती
दळू लागला जनीसंगती
ओवी गाउनि हा जगजेठी
भक्ताघरी रंगला

घास घेई नारायणा
नामदेव तो हट्ट सोडिना
श्रीपतिराणा त्रिभुवनाचा
भक्तासवे जेवला

कबिराघरचे विणले शेले
भक्त-प्रभू ते एकचि झाले
भक्तासवे त्या प्रभू नाचले
घेउनि भक्ति-ध्वजा

शुभं करोति कल्याणम्‌,Shubhan Karoti Kalyanam

शुभं करोति कल्याणम्‌ आरोग्यम्‌ धनसंपदा
संध्यासमयी संध्येसम हा मंत्र जपावा सदा

पुनव रूपेरी, दीपावलि वरि जरि उजळे अंबरी
देवापुढती नित्य विसावी एक ज्योत कापरी
त्या ज्योतीने भवति फुलावी शांतीची प्रतिपदा

सांज-प्रहरी सदनि लाविता सांजवात चिमुकली
प्रसन्न हो‍उनी लक्ष्मी येई गृही सोनपाउली
समीर येई मंद गतीने लुटीत निशिगंधा

घरकुल अपुले मंगल मंदिर गाभारा मनिचा
हर्ष-फुलांनी सदा भरावा सुरम्य प्रीतीचा
गृहमंदीरी गंध सुखाचा पसरावा सर्वदा

राधिका हरिभजनी रंगली,Radhika Hari Bhajani

कामधाम संसार विसरली
हरिभजनी रंगली,
राधिका हरिभजनी रंगली !

गोकुळ वदले राधा वेडी
संसाराची माया तोडी
जगावेगळे छंद आवडी
कुंजवनी राधिका पाहिली
राधिका हरिभजनी रंगली !

हरिभजनाने तुटले बंधन
मुक्त राधिका झाली पावन
गोकुळ बनले मग नंदनवन
मुरली वाजवितो वनमाळी
राधिका हरिभजनी रंगली !

आत्मरूप ते रूप हरीचे
मर्म उमजले संसाराचे
धन्य राधिका तिने पाहिली
विश्वस्वरुपी मुर्ती सावळी
राधिका हरिभजनी रंगली !

मेघासम हा शाम सांवळा,Meghasam Ha Sham Savala

मेघासम हा शाम सांवळा आणि राधिका बिजली
अशी ग रासक्रिडा रंगली !
रंगल्या गोकुळच्या गौळणी !

गोपगोपिका टिपरी घेउनि
पैंजण-नादे धुंद होउनी
नाचतात ग गीत गाउनी
कळली नाही नभी कशी ग चंद्रकोर कलली

सप्तसुरांच्या बासरीवरी
नाचत राही वसुधा सारी
लचकत-मुरकत राधा प्यारी
चमकत-चमकत बिजलीसम ती शामनयनी लपली

माती सांगे कुंभाराला,Maati Sange Kumbharala

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !

मला फिरविसी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी !

वीर धुरंधर आले गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी !

गर्वाने का ताठ राहसी ?
भाग्य कशाला उगा नाससी ?
तुझ्या ललाटी अखेर लिहिले आहे मीलन माझ्याशी !



प्रभातकाळी तुझे ईश्वरा,Prabhat Kali Tujhe Ishwara

प्रभातकाळी तुझे ईश्वरा, नाम मुखी येई
तूच माउली, तूच साउली, सावळे विठाई

नक्षत्रांचे दीप लोपले

विश्वकमळ हे पहा उमलले
चराचरावर अंधाराची, होते ही अस्ताई

एकतारि ही हाती घेउन
तुझेच करिते मंगल चिंतन
वाहियले हे जीवन माझे, प्रभु तुझ्या पायी

पुंडलिकाची पाहुनी भक्ती
उभा तूच या वीटेवरती
दासि जनी तुज शरण येतसे, जवळ तिला घेई

पैंजण हरिची वाजली,Painjan Harichi Vajali

पैंजण हरिची वाजली
गाईगुरं हंबरली

कमलाहुनि जे मोहक डोळे
श्यामल कांती अल्लड चाळे
झरझर झरझर नयनांपुढुनी,
प्रतिमा ती सरली

गोविंदाचा छंद जिवाला
चराचराला व्यापुनि उरला
ध्यानिमनीही स्वप्नी माझ्या,
नव आशा फुलली

हीच पाऊले माझ्या हरिची,
खूण असे ती हंबरण्याची
गाईगुरे ही आनंदाने,
नाचत बागडली

तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा,Tujhya Muralit Majhi Pratima

तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे

पदकमळे जी हरिची नाजुक
पैंजणेच मी त्यातिल मोहक
प्रभुची प्रीती मनि या आणिक
प्रेमळ भाव वसे

कृष्णमोहना मी तव माया
कमळमुखातिल वाणी मी राया
तुझीच सेवा सुखवी हृदया
अंतरि श्याम हसे

कांचनस्वप्ने नाचत,Kanchan Swapne Nachat

कांचनस्वप्ने नाचत उधळत, हसलि रात पुनवेची
श्यामसुंदरासवे रंगली, राधा गोकुळची

राजस श्रीहरि मदन जणू तो
कस्तुरि-मळवट भाळि शोभतो
हार फुलांचा कंठी रुळतो
अधरी पावा वाजवि मंजुळ, माखली उटी चंदनाची

राधेचा घननीळ सांवळा
गोकुळचा तो मुरलीवाला
घुमवित आला, सप्तसुरांला
गोकुळचा तो मुरलीवाला, चोरिली नीज राधिकेची

यमुनालहरी हरिगुण गाती
पायी पैंजण रुणझुणु करती
वाजवि पावा तो जगजेठी

रंगले गोकुळ, रंगलि गौळण, रंगली सखी मोहनाची