Showing posts with label S-श्रीकांत पारगावकर. Show all posts
Showing posts with label S-श्रीकांत पारगावकर. Show all posts

सूर कुठूनसे आले अवचित,Sur Kuthunse Aale Avachit

सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी दिवाण्या स्वप्नधुंद वाटा

निर्विकार मन होते केवळ
तोच स्वरांचा आला परिमळ
गंधित धूसर जादू घडली क्षणी बघता बघता

रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव
कणाकणांतुन दुखरे आर्जव
शब्दांपलिकडलेसे काही अस्फुट ये हाता

त्या स्वप्नांच्या वाटेवरती
अकल्पिताच्या गाठी-भेटी
अहेतुकाची प्रसन्न संगत अनाम मधुगीता

सूर भवतीचे सरले, विरले
काळजात पण अक्षय उरले
मनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटांवर लाटा

भेटशील केव्हा माझिया जीवलगा,Bhetashil Kevha Majhiya

भेटशील केव्हा, माझिया जीवलगा
उतावीळ मन तुझिया भेटी

तुझे रूप ध्यानीमनी
जागेपणी स्वप्नातुनी
विश्व शून्य तुजवाचुनी
माझिया जीवलगा

तुझा छंद जीवा जडे
तुझी साद कानी पडे
वाटे यावे तुझियाकडे
माझिया जीवलगा

नको असा दूर राहू
नको असा दूर ठेवू
नको असा अंत पाहू
माझिया जीवलगा

तूच मायबाप बंधू,Tuch Maay Baap Bandhu

तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा

धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया
जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी माया
परी तुझ्या ओळखीला माणूस पारखा

तुझ्या हाती असे एक पुरातन काठी
आवाज ना येई तिचा दिसे ना कुणा ती
कुणा देतसे आधार कुणाला तडाखा

सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
आनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका