Showing posts with label M-सुरेश भट. Show all posts
Showing posts with label M-सुरेश भट. Show all posts

राहिले रे अजून श्वास किती,Rahile Re Ajun Shvas Kiti

राहिले रे अजून श्वास किती
जीवना, ही तुझी मिजास किती

आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती

मी कसे शब्द थोपवू माझे ?
हिंडती सूर आसपास किती

दु:ख माझे... विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती

ओळखीचे कुणीतरी गेले...
ओळखीचा इथे सुवास किती

हे कसे प्रेम? या कशा आशा ?
मी जपावे अजून भास किती ?

सोबतीला जरी तुझी छाया...
मी करू पांगळा प्रवास किती ?

तुम्ही काय म्हणता याचा,Tumhi Kaay Mhanata Yacha

तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही
मी जिवंत आहे - माझा हा प्रमाद नाही !

मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही

हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा
परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही

कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे ? मला याद नाही !

तुला मीच रडतारडता धीर देत आहे
वादग्रस्त माझे अश्रु ह्यात वाद नाही

सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही

तशी जागा निवाऱ्याला,Tashi Jaga Nivaryala

तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती ?
पथारी टाकण्यासाठी जागाची ओसरी होती !

निघाले ते जरी खोटे, तरीही ते ’खरे’ होते-
दगा केला तरी त्यांची दगाबाजी खरी होती !

अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे,
तुम्ही हासाल, ही माझी कधीची खातरी होती !

मला जो चावला, त्याचा असा मोठेपण होता-
बिलोरी बायको होती ! गुलाबी नोकरी होती !

सकाळी तू उन्हापाशी जरी केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती !

मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे-
’तुला संधी जगायाची मिळालेली बरी होती !’

जिथे गेलो, तिथे माझी नद्यांनी कौतुके केली-
कधी इंद्रायणी होती ! कधी गोदावरी होती!

दिले जे देवदूतांनी, कुठे तेही कमी होते ?
हवेची झोपडी होती ! भुकेची भाकरी होती !

अरे, ह्या जिंदगानीची कधी मी काळजी केली ?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती !

खरेच माझा जगावयाचा,Kharech Majha Jagavayacha

खरेच माझा जगावयाचा विचार होता ...
खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !

निमूट माझे जिणे मला सोसता न आले,
अखेरच्या वागण्यात माझा विखार होता !

तुझा इथेही कसा कळेना, सुगंध आला ?
कसा तुझा तो फुलावयाचा प्रकार होता ?

कसे तुला भान एवढे राहिलेच नाही ?
प्रवास माझा कधीतरी संपणार होता!

सुनावणीला कधीच मी आणला न गेलो ...
कसा निवाडा ? अरे, खुला तो प्रचार होता !

दिसूनही दार तो तेथे थांबालाच नाही,
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता !

अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो
तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !

अजूनही मी कधीकधी मोहरून जातो ...
कितीकिती लाघवी तुझा तो नकार होता !

कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू ...
खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता!हरेक वेळी तुला दिली दूषणे, जगा, मी,
हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता !

अखेर गावामधून त्या मी निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता !

केला करार त्यांनी,Kela Karar Tyani

आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी !
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी !

त्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी,
आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी !

त्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा,
आधीच बंद केले एकेक दार त्यांनी !

त्यांच्या शिरी कधीचे देणे युगायुगांचे-
आता फिरून केला सौदा उधार त्यांनी!

त्यांचे हजार कावे अन्‌ लाख बारकावे,
हा पहिलाच नाही माझा प्रकार त्यांनी !

झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे,
माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी !

माझ्या घरात आला पाऊस माणसांचा-

त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी !

ते चोखतात आता हाडे नव्या पिढीची-
अद्यापही दिलेला नाही डकार त्यांनी !