तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती ?
पथारी टाकण्यासाठी जागाची ओसरी होती !
निघाले ते जरी खोटे, तरीही ते ’खरे’ होते-
दगा केला तरी त्यांची दगाबाजी खरी होती !
अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे,
तुम्ही हासाल, ही माझी कधीची खातरी होती !
मला जो चावला, त्याचा असा मोठेपण होता-
बिलोरी बायको होती ! गुलाबी नोकरी होती !
सकाळी तू उन्हापाशी जरी केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती !
मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे-
’तुला संधी जगायाची मिळालेली बरी होती !’
जिथे गेलो, तिथे माझी नद्यांनी कौतुके केली-
कधी इंद्रायणी होती ! कधी गोदावरी होती!
दिले जे देवदूतांनी, कुठे तेही कमी होते ?
हवेची झोपडी होती ! भुकेची भाकरी होती !
अरे, ह्या जिंदगानीची कधी मी काळजी केली ?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती !
No comments:
Post a Comment