केला करार त्यांनी,Kela Karar Tyani

आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी !
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी !

त्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी,
आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी !

त्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा,
आधीच बंद केले एकेक दार त्यांनी !

त्यांच्या शिरी कधीचे देणे युगायुगांचे-
आता फिरून केला सौदा उधार त्यांनी!

त्यांचे हजार कावे अन्‌ लाख बारकावे,
हा पहिलाच नाही माझा प्रकार त्यांनी !

झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे,
माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी !

माझ्या घरात आला पाऊस माणसांचा-

त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी !

ते चोखतात आता हाडे नव्या पिढीची-
अद्यापही दिलेला नाही डकार त्यांनी !

No comments:

Post a Comment