खरेच माझा जगावयाचा विचार होता ...
खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !
निमूट माझे जिणे मला सोसता न आले,
अखेरच्या वागण्यात माझा विखार होता !
तुझा इथेही कसा कळेना, सुगंध आला ?
कसा तुझा तो फुलावयाचा प्रकार होता ?
कसे तुला भान एवढे राहिलेच नाही ?
प्रवास माझा कधीतरी संपणार होता!
सुनावणीला कधीच मी आणला न गेलो ...
कसा निवाडा ? अरे, खुला तो प्रचार होता !
दिसूनही दार तो तेथे थांबालाच नाही,
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता !
अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो
तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !
अजूनही मी कधीकधी मोहरून जातो ...
कितीकिती लाघवी तुझा तो नकार होता !
कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू ...
खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता!
हरेक वेळी तुला दिली दूषणे, जगा, मी,
हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता !
अखेर गावामधून त्या मी निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता !
No comments:
Post a Comment