Showing posts with label M-कौशल इनामदार. Show all posts
Showing posts with label M-कौशल इनामदार. Show all posts

लाभले अम्हास भाग्य,Labhale Amhas Bhagya

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

लागले मन परतीच्या,Lagale Man Partichya

लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती

वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भिजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती

नकोस थांबू पैलतटावर पुन्हा मांडू ये डाव पटावर
पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती

चुकले कोठे कधी कुणाचे या साऱ्याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती

विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती

रुमझुम पैंजण नाद,RumJhum Painjan Naad

रुमझुम पैंजण नाद सुमोहन नाचत आले रे
रंग अजुनही फुलाफुलांवर नवथर ओले रे

रुणझुण मनघन आर्त सुलोचन लाजळ झाले रे
त्यात सावली तुझ्या रुपाची काजळ न्हाले रे

उठले वारे मनभरणारे कुठुन आले रे
आंदोलत रेशीम झुल्याचे लवथव दोले रे

तुझे अनावर मुक्त मनोहर मोर निघाले रे

घर परतीच्या वाटेवरती,Ghar Paratichya Vatevarati

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा

घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे

घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे



गर्द निळा गगनझुला,Gard Neela Gagan Zula

दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

कोवळ्या गुलाबाची पाकळी दंवाची
झेलताना तोल गेला काळजाला भार झाला
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

आठवण तुझी सारखी निघे; काजव्यांची पालखी
रोज ओले फुलांचे दोन डोळे
रेघ काजळाची कोवळी,
चंदनी शहाऱ्याचा, गंधल्या मिठीचा
तू किनारा आज माझ्या जीवनाला लाभलेला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

डोळे माझे भिरभिरले; मोर पापण्यांचे लाजले
चांदराती फुलांच्या सांजवाती
स्पर्श अमृताचे झेलले,
बावऱ्या निखाऱ्याची, आग ही उराशी
सोसताना श्वास ओला केशराचा गंध आला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

सुनीसुनी रात चालली; साय सावलीची दाटली
मंद झाले बिलोरी चांदणे हे
नीज पाखरांची मोडली,
जांभळ्या क्षितिजाला, चंद्र हा बुडाला
पहाटेला मोगऱ्याचा पूर आला, सूर झाला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला