गर्द निळा गगनझुला,Gard Neela Gagan Zula

दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

कोवळ्या गुलाबाची पाकळी दंवाची
झेलताना तोल गेला काळजाला भार झाला
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

आठवण तुझी सारखी निघे; काजव्यांची पालखी
रोज ओले फुलांचे दोन डोळे
रेघ काजळाची कोवळी,
चंदनी शहाऱ्याचा, गंधल्या मिठीचा
तू किनारा आज माझ्या जीवनाला लाभलेला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

डोळे माझे भिरभिरले; मोर पापण्यांचे लाजले
चांदराती फुलांच्या सांजवाती
स्पर्श अमृताचे झेलले,
बावऱ्या निखाऱ्याची, आग ही उराशी
सोसताना श्वास ओला केशराचा गंध आला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

सुनीसुनी रात चालली; साय सावलीची दाटली
मंद झाले बिलोरी चांदणे हे
नीज पाखरांची मोडली,
जांभळ्या क्षितिजाला, चंद्र हा बुडाला
पहाटेला मोगऱ्याचा पूर आला, सूर झाला-
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला

No comments:

Post a Comment