Showing posts with label जगाच्या पाठीवर (१९६०). Show all posts
Showing posts with label जगाच्या पाठीवर (१९६०). Show all posts

विकत घेतला श्याम,Vikat Ghetala Shyam

नाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम !

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !

जितुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे
कुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम !

नाचनाचुनी अति मी,Nach Nachuni Ati Mi

नाचनाचुनी अति मी दमले
थकले रे नंदलाला !

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठि घातली माला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला-गेला

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

धक्का लागला ग,Dhakka Lagala Ga

धक्का लागला ग मघाशी कुणाचा
तोल सावरेना बाई, अजुनी मनाचा !

उगा हासला तो, उगा लाजले मी
करी वीज त्याच्या, उरी भाजले मी
ठसा राहीला ग मुक्या भाषणाचा !

पुढे चालले मी, फिरे पाय मागे
कशाची कळेना अशी ओढ लागे
सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा !

झरू लागल्या ग ढगातून धारा
मनीच्या विजेचा मनी कोंडमारा
ठिकाणा तरी ग कुठे साजणाचा ?

भिजे पावसाने जरी अंग सारे

उफाळून येती उरीचे निखारे
शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा !

तुला पाहते रे तुला,Tula Pahate Re Tula

तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !

तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे !
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !


कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?
नदी न्याहळी का कधी सागराला ?
तिच्यासारखी मी सदा वाहते !

जग हे बंदीशाला,Jag He Bandishala

जग हे बंदीशाला
कुणी न येथे भला चांगला
जो तो पथ चुकलेला !

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी
प्रिय हो ज्याची त्याला !

जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलिकडे
उंबरातले किडे-मकोडे
उंबरि करिती लीला !

कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते
जो आला तो रमला !