Showing posts with label S-सलील कुळकर्णी. Show all posts
Showing posts with label S-सलील कुळकर्णी. Show all posts

संधिप्रकाशात अजून जो,Sandhiprakashat Ajun Jo

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा.

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब:
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.

सुखोत्सवे असा जीव अनावर:
पिंजऱ्याचे दार उघडावे.

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी;

असावीस पास, जसा स्वप्रभास,
जीवी कासावीस झाल्यावीण;

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण त्याची नाही;

तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे;

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली;

लागते अनाम ओढ,Lagate Anam Odha

लागते अनाम ओढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना ?

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकीफिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शहाण्यासारखेच चालले होते तुझे सारे
वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा

एकांती वाजतात पैंजणे, भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना..

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद
नको म्हणून गेलीस तेही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद

मी असा जरी नीजेस पारखा, रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच नीजताना..

सहजतेच्या धूसर तलम पडद्या मागे, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून ?

आजकाल माझाही नसतो मी, सर्वांतून एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फिरताना..

नसतेस घरी तू जेव्हा,Nasates Ghari Tu Jevha

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

देते कोण देते कोण,Dete Kon Dete Kon

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग

पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देते कोण देते कोण देते कोण देते ?

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देते कोण देते कोण देते कोण देते ?

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि अळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देते कोण देते कोण देते कोण देते ?

आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
भुईतून येतो तरी नितळ हा झरा
चिखलात उगवून तांदूळ पांढरा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

मुठभर बुल्बुल, हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे का रे दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

भिजे माती आणि तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर पुढे दहा फाटे
देते कोण देते कोण देते कोण देते ?

दूरदेशी गेला बाबा,Dur Deshi Gela Baba

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभर दमवला
"आता पुरे ! झोप सोन्या.." कुणी म्हणतच नाही

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही.. कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

तुझ्यामाझ्या सवे कधी,Tujhya Majhya Save Kadhi

तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला-
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

अता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खूणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

तव नयनांचे दल हलले,Tav Nayananche Dal Halale

तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हे डळमळले ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"


हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !

ॐकार अनादि अनंत अथांग Omkar Anadi Anant Athang

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार

नाद ब्रम्ह परमेश्वर सगूण रूप साकार


सूर स्पर्श सूर श्रवण

स्वर गंधित आश्वासन

तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार



सूर साध्य स्वर साधन

सूर रूप स्वर दर्पण

स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार


सप्तसूर स्वर्ग सात

स्वर सांत्वन वेदनांत

सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार


अताशा असे हे मला काय,Atasha Ase He Mala Kaay

अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे, यायचे, भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही


कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?

अजून उजाडत नाही (२), Ajoon Ujadat Nahi (2)

अजून उजाडत नाही ग !

शून्य उभे या उगमापाशी शून्यच केवळ अंती ग
अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग
अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग
अंतरातल्या विश्वासाची आता नुरली द्वाही ग
अजून उजाडत नाही ग !

गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग
सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग
जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग
अजून उजाडत नाही ग !



अजून उजाडत नाही (१),Ajoon Ujadat Nahi (1)

अजून उजाडत नाही ग !

दशकांमागून सरली दशके अन्‌ शतकांच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग
पथ चकव्याचा, गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला ? फरफट अवघी, पान जळातून वाही ग
अजून उजाडत नाही ग !

कधी वाटते दिवस-रात्र हे नसते काही असले ग
त्यांच्या लेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता, कानी कूजन नाही ग
अजून उजाडत नाही ग !

एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतून उमलत नाही ग
अजून उजाडत नाही ग !