तव नयनांचे दल हलले,Tav Nayananche Dal Halale

तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हे डळमळले ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"


हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !

No comments:

Post a Comment