Showing posts with label M-गिरीश जोशी. Show all posts
Showing posts with label M-गिरीश जोशी. Show all posts

रक्तामध्ये ओढ मातीची,Raktamadhye Odha

रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधीमधे डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्तापरि ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

युगामागुनी चालली रे,Yugamaguni Chalali Re

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना

नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे !

परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन्‌ जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती !

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा,
मला वाटते विश्व अंधारले !

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारूनी दारूण.

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतिची लाजुनी लाल-
होऊनिया लाजरा मंगळ.

निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला धृव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव !

परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे !

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग, तुझ्या-
स्मृतीने उले अन्‌ सले अंतर !

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा !

अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌
मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण !



माझिया दारात चिमण्या,Majhiya Darat Chimanya

माझिया दारात चिमण्या आल्या
अबोल काहीसे बोलून गेल्या

कळले सारे नि कळले नाही
अबोध मनाची हासली जुई

दाटून निशात उतला गंध
झडली जाणीव गळले बंध

प्राणांस फुटले अद्‍भूत पंख
तंद्रीत भिनला आकाश डंख

माझिया दारात चिमण्या आल्या
आगळे वेगळे सांगून गेल्या

बाळ उतरे अंगणी,Baal Utare Angani

बाळ उतरे अंगणी बाळ उतरे अंगणी

बाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो साऊली
चिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळी

बाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायली
हाती बाळाच्या यावीत फुले, फुलांची डहाळी


बाळ उतरे अंगणी, भान कशाचे न त्याला
उंचावून दोन्ही मुठी कण्या शिंपीतो चिऊला

बाळ उतरे अंगणी, कसे कळाले चिऊला
भर्भरा उतरून थवा पाखरांचा आला

धिटुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण
चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण

पुस्तकातली खूण कराया,Pustakatali Khoon Karaya

पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस, पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहिसे देता-घेता त्यात थरारे

मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला
देता-घेता उमटे काही मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे-घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा
देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा

दारा बांधता तोरण,Dara Bandhata Toran

दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले

भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली

सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी

भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशिर्वाद केळ म्हणाली हासून


येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी

सोनचाफ्याची पाउले आज आलीत अंगणी

आला किनारा आला किनारा, Aala Kinara Aala Kinara

आला किनारा, आला किनारा
निनादे नभी नाविकांनो इशारा

उद्दाम दर्यामध्ये वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा

प्राकाशे दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्यालाल हिंदोलती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा

जयांनी दले येथ हाकारली
क्षणासाठी या जीवने जाळली
सुखैनैव स्वीकारून शूल-कारा

तयांची स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा