युगामागुनी चालली रे,Yugamaguni Chalali Re

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना

नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे !

परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन्‌ जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती !

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा,
मला वाटते विश्व अंधारले !

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारूनी दारूण.

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतिची लाजुनी लाल-
होऊनिया लाजरा मंगळ.

निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला धृव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव !

परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे !

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग, तुझ्या-
स्मृतीने उले अन्‌ सले अंतर !

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा !

अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌
मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण !No comments:

Post a Comment