Showing posts with label एकटी (१९६८). Show all posts
Showing posts with label एकटी (१९६८). Show all posts

लिंबलोण उतरू कशी,Limbalon Utaru Kashi

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू

धन्य कूस आईची, धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला, फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले, फेडिलेस पांग तू

शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी
आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू

नाविका चल तेथे,Navika Chal Tethe

नाविका चल तेथे, दरवळते जेथे चांदणे

जिथे उन्हाचा स्पर्शहि लोभस
सरगम गुंजत झरतो पाऊस
फुलासारखे तिथे फुलावे, तुझे नि माझे जिणे

मखमालीची जिथली हिरवळ
मुळी न सुकते सुमनांचे दळ

अवकाशाच्या तारा छेडी, वारा मंदपणे

प्रिय नयनातील, भाव वाचता
चुकुन दिसावा मोर नाचता
दूर देशीचे बुलबुल यावे, कधी मधी पाहुणे

चल सोडून हा देश,Chal Sodun Ha Desh

आईलाही विसरून जाती या देशातील पिले अडाणी
चल सोडून हा देश पक्षिणी

विराण झाले अरण्य सारे

भण भण करीती, भीषण वारे
दिसे न कोठे कण अन्नाचा, कुठे दिसेना पाणी

मोडून पडली, घरटी कोटी

कशी राहशील इथे एकटी
इथे न नांदे कोणी जिवलग, नसे आप्तही कोणी

उडुन उंच जा ऊर्ध्व दिशेला

मार्ग मानिनी अन्य न तुजला
स्वार्थाविण ना धर्म जाणिती, खुळे येथले प्राणी