Showing posts with label अवघाचि संसार (१९६०). Show all posts
Showing posts with label अवघाचि संसार (१९६०). Show all posts

रूपास भाळलो मी,Roopas Bhalalo Mi

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला !

एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला !

चंद्रा, ढगांतुनी तू हसलास का उगा, रे ?
वाकून खालती अन्‌ का ऐकलेस सारे ?
जे ऐकले तुवा ते, सांगू नको कुणाला !

वाऱ्या, तुझी कशाने चाहूल मंद झाली ?
फुलत्या फुला, कशाला तू हसलास गाली ?
जे पाहिले तुवा, ते सांगू नको कुणाला !

हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला !

हा लाजरा शहारा पाहील काय कोणी ?
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही ?
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला !

राम भजन कर लेना,Ram Bhajan Kar Lena

राम भजन कर लेना
एक दिन जाना, रे भाई !

दोन दिसांची ही तर दुनिया
ही पैशाची सारी किमया
धनदौलत ही केवळ माया
अंती येता हाक दूरची
जिथल्या तेथे राही
एक दिन जाना, रे भाई !

बाप कोठला ? अन्‌ कुठली आई ?
कुठले भाई ? अन्‌ कुठल्या ताई ?
अखेर अपुले कोणी नाही
तुटे पिंजरा, सुटे पाखरू
दूर भरारी घेई
एक दिन जाना, रे भाई !

पाया पडता लाथ मारिती
लाथ मारिता गुलाम होती
हीच जगाची उलटी रीती
आशा जगाची कशास भिती ?
पडू नको या मोही
एक दिन जाना, रे भाई !

बहरुन ये अणुअणू,Baharun Ye Anu Anu

बहरुन ये अणुअणू
जाहली रोमांचित ही तनु

नकळत मिळता नजरा दोन्ही
लहरत गेली वीज नसांतुनि
गेले, बाई, मी बावरुनी
किमया घडली जणू

उमलुन आली रात्र चांदणी
गंध दरवळे फुलांवाचुनी
अंगांगावर लहर चंदनी
सुख लागे रुणुझुणू

दवांपरी ते सुख टपटपले
ओठांनी या अलगद टिपले
आजवरी जे हृदयी जपले,
तेच लाभले जणू