हटातटाने पटा रंगवुनि,Hata-Tatane Pata

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥

वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥

काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेशी दुधा ॥

भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा ।
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा ।
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।
तथापि न होय हरीची कृपा ।
दर्भ मुष्टिच्या गर्भि धरुनि निर्भर पशुची वपा ।
जाळिशी तिळा तांदुळा तुपा ॥

दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा ।
न सार्थक लटक्या सार्‍या गपा ॥
ही बारबार तलवार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा ।
सदा हरि कविरायावर फिदा ॥

2 comments:

  1. खूपच सुंदर तत्वज्ञान... शाहीर राम जोशींच्या निर्भिड कर्तुत्वाला सलाम.

    ReplyDelete
  2. अशा चित्रपटांमुळेच हिंदु धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे .....
    हे कटू सत्य आहे ...!

    ReplyDelete