पत्रास कारण की,Patras Karan Ki


पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही

माफ कर पारो मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पिकाला ग नाही कवड्या भेटल्या
"चार बुकं शिक" असं कसं सांगु पोरा
"गहाण ठेवत्यात बापाला का?" विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जिमीनीनं सारं पिकं गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळा धारा
कर्जापायी भटकून शिर्पा ग्येला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही

आई तुझ्या खोकल्याचा आवाज घुमतो कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामंच ते, जीव द्याया आलं कामी
माजं अन्‌ सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकऱ्या किमत न्हाई