घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
अरं भंडार वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)
बारा कोसावर एक वाळी आहे, तिथं एक मारावाळी आहे,
त्याचा मोठा वाळा आहे, अन् त्यावर महादरो आहे
आता पाहू दे मणभर सोनं मला रं भंडार वाहीन तुला
( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)
मणभर सोनं ह्याले पाहिजे
( कोणासाठी ?... स्वत:साठी ..)
अन् खंडोबाले देणार काय ?
हयद नुसती दोन चिमटी !
( बाप्पा हा सौदा झाला )
लेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
बकरू कापीन तुले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )
मी अन् माह्या दोन सवती कोन्या एकीलेही नाई संतती
त्याहींच्या आंधी कुरपा कर माह्यावरती
लोटांगण घालतो तुह्या पायावरती
( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )
दगडाचा देव घेत नाही देत नाही
पापाची साथ कुणी करत नाही
नवसानं पोर कोणाले होत नाही
माणुस खादाळ देव काही मांगत नाही
देव म्हनता का धोंड्याला ?
धान म्हनता का कोंड्याला ?
( जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल )
No comments:
Post a Comment