महाराज गवरीनंदना,Maharaj Gavari Nandana

महाराज गवरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ।
ठेव कृपा दृष्टी एकदंत दीनावर पुरती ॥

हे स्वयंभू शुभदायका हे गणनायका गीतनायका अढळ दे स्फूर्ति ।
भवसमुद्र जेणेंकरून सहजगति तरती ।
महाराज गौरीनंदना हो महाराज गौरीनंदना ॥

म्हणऊन लागतो चरणी हे गजमुखा ।
दे देवा निरंतर स्मरणींच्या मज सुखा ।
दूर करी अंत:करणीच्या बा दु:खा ।
जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामीसहोदरा हे विघ्ननिवारी ।
मज रक्षीं रक्षीं सहकुटुंब सहपरिवारीं ॥

तिन्ही त्रिकाळ गणगंधर्व न करितां गर्व साधुनी पर्व सर्व देवांनी ।
आळविली तुला गाऊन मधूर ही गाणी ।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ॥

हे प्राणी प्राण तव स्मरणाने जगवती ।
शशिसूर्य तुझ्या बळ भरणाने उगवती ।
हे धन्य धन्य अन्नपूर्णे श्री भगवती ।
कविराज असा हा दक्ष सेवेमध्ये लक्ष तयाचा पक्ष धरुन मज तारीं ।
महादेव प्रभाकर रक्षीं या अवतारीं ।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ॥



No comments:

Post a Comment