चल्‌ झेलूया गाणे,Chal Jheluya Gane

चल्‌ झेलूया गाणे, वासंतीक उखाणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

गर्भरेशमी पाउलवाटा कशा सुगंधी झाल्या ?
जळथेंबाचा पाउस नसुनी दिठीदिठीतुन न्हाल्या
हे कुठले अमृतदेणे ? हे वासंतीक उखाणे;

कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

पदराचा कापूर जाहला, हवेत उडतो बाई
डोळ्यांमधल्या स्वप्नांवरती, रंग शिंपुनी जाई
हे पंख नसुनी उडणे, हे वासंतीक उखणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

मंदिर झाले या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू
ओंजळीतला ऋतू फुलांचा, कुठल्या चरणी वाहू ?

हे तुझेच अक्षय लेणे, हे वासंतीक उखाणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

No comments:

Post a Comment