सन्मित्र राघवांचा सुग्रीव,Sanmitra Raghavancha

साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

रामा, तुझ्यापरी मी वनवास भोगताहें
हनुमन्मुखें तुला तें साद्यंत ज्ञात आहे
दुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला

बंधूच होय वैरी, तुज काय सांगुं आर्या !
नेई हरून वाली माझी सुशील भार्या
वालीस राघवा, त्या तूं धाड रौरवाला

बाहूंत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य-लाभ होतां होईन शक्तिशाली
माझेंच शौर्य सांगूं माझ्या मुखें कशाला ?

होतां फिरून माझें तें सैन्य वानरांचे
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला

ते शोधितील सीता, संदेह यात नाहीं
निष्ठा प्लवंगमांची तूं लोचनेंच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला

झालेच सख्य रामा, देतों करीं करातें
आतां कशास भ्यावे कोणा भयंकरातें ?
तूं सिद्ध हो क्षमेंद्रा, वालीस मारण्याला

घालीन पालथी मी सारी धरा नृपाला
रामासमीप अंतीं आणीन जानकीला
धाडीन स्वर्ग-लोकीं येईल आड त्याला

हनुमान, नील, ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण यांची आतां मला तुम्हांला

No comments:

Post a Comment