मी काय तुला वाहू,Mi Kay Tula Vahu

मी काय तुला वाहू ?
तुझेच अवघे जीवितवैभव
काय तुला देऊ ?

नक्षत्रांच्या रत्‍नज्योति
तुझिया ओटीवर झळझळती
दीप रविचे घरी तुजपुढती
वात कशी लावू ?

चतुर फुलारी वसंत फुलवित
तुजसाठी सुमसंचय अगणित
कशी लाजरी अर्ध सुगंधित
कळी करी ठेवू ?

झुलती तव सदनाच्या दारी
सांज-उषेचे पट जरतारी
विणतो विभु अंबर चंदेरी
वसन कुठे पाहू ?

एकच आहे माझी दौलत
नयनी जो हा अश्रू तरंगत
मानवतेचे ज्यात मनोगत
तोच पदी वाहू

No comments:

Post a Comment