प्रभो मज एकच वर,Prabho Maj Ekach Var

प्रभो, मज एकच वर द्यावा
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा

कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा, या चरणांपासुन
जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा

रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
श्रीरामा, मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा

पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा

मेघासम मी अखंड प्राशिन
असेल तेथुन श्रीरामायण
मेघापरि मी शतधारांनीं करीन वर्षावा

रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा


जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा

असंख्य वदनें, असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र-गौरव त्यांनी सांगावा

सूक्ष्म सूक्ष्मतम देह धरुनी
फिरेन अवनीं, फिरेन गगनी
स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा

No comments:

Post a Comment