लीलया उडुनी गगनांत
पेटवी लंका हनुमंत
नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात
या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
चालला नगर चेतवीत
भडके मंदिर, पेटे गोपुर
द्वार कडाडुन वाजे भेसुर
रडे, ओरडे, तों अंतःपुर
प्रकाशीं बुडे वस्तुजात
जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे प्रासादांची
चिता भडकली जणूं पुराची
राक्षसी करिती आकांत
कुणी जळाले निजल्या ठायीं
जळत जळत कुणि मार्गी येई
कुणि भीतीनें अवाक होई
ओळखी नुरल्या प्रलयांत
माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
उभें तेवढें पडें आडवें
अचानक आला कल्पांत
खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
सघनता होय भस्मसात
वारा अग्नी, अग्नी वारा,
नुरे निवारा, नाहीं थारा
जळल्या वेशी, जळे पहारा
नाचतो अनल मूर्तिमंत
No comments:
Post a Comment