पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा
मी वारकरी आगळा
समानतेच्या विहिरीमधली पुण्याईची चंद्रभागा
न्हाऊ घालते, पावन करते चराचरातील पांडुरंगा
पाटामधुनी तीर्थ चालले, पिकवित कांदा, भाजी, मुळा
मणिमोत्यांचा मंदील बांधुन डुलत शिवारी राव जोंधळा
विठ्ठल नामे कणकण टिपतो पाखरांचा हसरा मेळा
उसात भरता रसाळ गोडी मोर सांगतो निळा
तीर्थरूप त्या प्राणपित्याची मीच समाधी बांधलेली
भावभक्तिची फुले वाहिली हात जोडून सांजसकाळी
या मातीचा अबिर कपाळी, भक्त पुंडलीक पुत्र खुळा
No comments:
Post a Comment