निरांजन पडले तबकात
बाळ तव गेला समरात
क्षणआधि तर तेवत होती
पूजेमधली प्रशांत ज्योती
दृष्ट कुणाची लागुन का ती
विझली निमिषात
ओवाळुनही झाली नव्हती
तोच उधळली मंगल आरति
का पडली बाळाची आहुति
संगर-यज्ञात
रागरागिणी आळवुन झाली
आयुष्याची कविता सरली
दुर्दैवाने माता बसली
भैरवि आळवीत
परक्यांना करण्यास्तव तर्पण
फूल पोटिचे केले अर्पण
निर्माल्याला तुडवु नका पण
सोडा गंगेत
आता मज द्या शव तर आणुनी
झाकिन ते मी ऊर फाडुनी
भडाग्नि शोकातले देऊनी
निजेन सरणात
No comments:
Post a Comment