नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !
वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध !
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !
लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !
No comments:
Post a Comment