दिवाळी येणार अंगण सजणार,Diwali Yenar Angan Sajnar

दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटातूट
चंद्र ज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

No comments:

Post a Comment