धरित्रीच्या कुशीमधे,Dharitrichya Kushimadhye

धरित्रीच्या कुशीमधे
बियबियाणं निजली
वर पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय डरारे भुईत

सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं
अंगावरती शहारं

ऊनवाऱ्याशी खेळता
एका एका कोंबांतून

प्रगटली दोन पानं
जसे हात ते जोडून

टाळ्या वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा
होऊ दे रे आबादनी

दिसमासा होय वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाला बहर

झाली शेतामध्ये दाटी

कशी वाऱ्यानं डोलती
दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी
देव अजब गारुडी

No comments:

Post a Comment