दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार
आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध, ती मृगया भीषण
पारधींत मी वधिला ब्राम्हण
त्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार
त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानीं
यमदूतांचे शंख होउनी
त्याच्यासम मी पुत्रव्योगें तृषार्तसा मरणार
श्रीरामाच्या स्पर्षावाचुंन
अतृप्तच हें जळकें जीवन
नाहीं दर्शन, नच संभाषण
मीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार
मरणसमयिं मज राम दिसेना
जन्म कशाचा ? आत्मवंचना
अजुन न तोडी जीव बंधना
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे दार?
कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदनसुधाकर
फुलेल का या गाढ तमावर?
जातां जातां या पाप्यावर फेकित रश्मितुषार
अघटित आतां घडेल कुठलें?
स्वर्गसौख्य मी दूर लोटले
ऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,
भाग्यासह तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार
पाहतील ते राम जानकी
देवच होतिल मानवलोकीं
स्वर्गसौख्य तें काय आणखी?
अदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार?
क्षमा करी तूं मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती उर्मिले
क्षमा प्रजाजन करा, चाललों सूखदःखांच्या पार
क्षमा पित्याला करि श्रीरामा
पतितपावना मेघश्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार
श्री राम-श्री-राम-रा-म
No comments:
Post a Comment