तात गेले, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका
वैनतेयाची भरारी काय माशकां साधते ?
कां गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादतें ?
राज्य करणें राघवांचे अज्ञ भरता शक्य का ?
वंशरीतीं हेंच सांगे- थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, ज्येष्ठ ऐसा काननीं ?
दान देतां राज्य कैसे या पदांच्या सेवका ?
घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो ?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका ?
पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका
राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या ही मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका
चालवितों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा
सांगतां तेव्हां न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका
No comments:
Post a Comment