जीवन त्यांना कळले हो,Jeevan Tyana Kalale Ho

मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचराचे हो‍उनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो


सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍उनि जे वळले हो

जीवन त्यांना कळले हो

दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित हो‍उनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने

फुलले अन्‌ परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन
घरीच ज्यां आढळले हो
उरीच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो

No comments:

Post a Comment