जा, झणि जा, रावणास सांग एकदा
शेवटचा करि विचार फिरुन एकदां
नगरद्वारिं राम उभा सिंधु लंघुनी
रणरागीं वानरगण जाय रंगुनी
शरण येइ राघवास सोडुनी मदा
वरलाभें ब्रम्ह्याच्या विसरुनी बला
पाप्या, तूं पीडिलेंस अखिल पृथ्विला
छळिसी तूं देव, नाग, अप्सरा सदा
उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा
शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा
जाळिल तव वंश, सर्व राज्य-संपदा
शंखनाद ऐक, देख धरणिकंप ते
तुजसाठीं राक्षसकुल आज संपले
अजुन तरी सोड तृषा तव घृणास्पदा
अंती तरि सोड मूढ वृत्ती आपुली
परतुन दे राघवास देवि मैथिली
शरणागत होइ त्यास, टाळ आपदा
स्थिर राही समरीं रे समय जाणुनी
जातिल तुज रामबाण स्वर्गि घेउनी
वाट उरे हीच एक तुजसि मोक्षदा
नातरि बल मायावी दाव संगरीं
ज्यायोगें हरिली तूं रामसहचरी
वज्राप्रति भिडव बाण, मेरुसी गदा
नामहि तव भूमीवर कठिण राहणें
आपणिली रामकृपा सुज्ञ विभिषणें
लंकेच्या भूषवील तोच नृपपदां
No comments:
Post a Comment