ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे
मज उगा वाटतें वनीं विहरा जावें
पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें
कानांत बांसरी वंशवनांतिल वाजे
वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें
वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं
घागरी कटीवर, करांत घ्यावी झारी
मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें
वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं
तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं
चाखून बघावें अमृतान्न तें ताजें
सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं
गळतील सुगंधित जधीं मंजिऱ्या भालीं
करतील गर्जना दुरुन वनाचे राजे
घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं
वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं
पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें
वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजें
कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा ?
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे ?
No comments:
Post a Comment