चंद्रावरती दोन गुलाब,Chandravarati Don Gulab

चंद्रावरती दोन गुलाब !
सहज दृष्टिला घडला लाभ

उंच इमारत संगमरवरी
उभी गवाक्षी यवन सुंदरी

पडदा सारुन बघे बावरी
गोल चेहरा नयनि शराब

पथक सोडुनी वळे वाकडा
थयथय नाचत अबलख घोडा
वरिल मराठा गडी फाकडा
दुरुन न्याहळी तिचा रुबाब

किंचित्‌ ढळती निळी ओढणी
भाळावरती हळुच ओढुनी
तीहि न्याहळी त्यास मोहुनी
नयनांचे मग मुके जबाब

तोच येउनी भिडली काना
राघोबाची मेघगर्जना
नगरपार ही चलु द्या सेना
वळला घोडा सरला लाभ

अटकेवरती झेंडे रोवुनि
पुण्यास आल्या परत पलटणी
तरीहि त्याच्या मनी लोचनी
तरळत होते एकच ख्वाब

No comments:

Post a Comment