विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्र ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था
कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगूर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो
मीच घडवीतो मीच मोडीतो उमज आता परमार्था
कर्मफुलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
Thanks for this song
ReplyDelete