गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले
जन्मोजन्मीची सुवासीन मी, तुझ्यामुळे जाहले
दिसायला मी काळी सावळी, मुलखाची लाजरी
नटणे, सजणे या भोळीला, ठाऊक नसता परी
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
वठल्या देही चैत्रपालवी, कणकण मोहरले
प्रीतीची तव खातर होऊन, तुझ्याकडे धावले
जनरूढीच्या लोहशृंखला, झाली जड पाउले
कुचाळकीची आग पसरुनी, उठता ही वादळे
हात देउनी तूच राजसा, फुलापरी झेलले
पाचूचा हा चुडा भरुनिया, तुजभवती नाचले
आनंदाचे अश्रू उधळित, सप्तपदी चालले
तूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले
अभागिनीच्या कुंकू कपाळी, सख्या तूवा लाविले
No comments:
Post a Comment