असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे ... नसायचे.
असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका;
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.
असाच हा श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
No comments:
Post a Comment