अंतरंगी रंगलेले गीत,Antarangi Rangalele Geet

अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके
दु:ख माझे हे मुके !

बहरलेल्या मीलनाचे सूर होते लागले
चित्र मोहक नंदनाचे लोचनांनी पाहिले
उघडता परि नेत्र केवळ भोवती दाटे धुके
दु:ख माझे हे मुके !

बंध सारे तोडुनी मी घेतली होती उडी
अमृताने नाहली रे उत्सवाची ती घडी
त्या स्मृतीचा कैफ लेवुन आज हसती हुंदके
दु:ख माझे हे मुके !

तव स्मृतीचा कोष बसला विश्व माझे व्यापुनी
सहज तू गेलास अदया, सर्व धागे तोडुनी
क्षणभरी उमलून विरले स्वप्न नवथर लाडके
दु:ख माझे हे मुके !

वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा
मजवरी केलीस प्रीती सांग हे परि एकदा
क्षण सुखाच्या मोहराचे फिरुन होतिल बोलके
दु:ख जरि माझे मुके !
दु:ख माझे हे मुके !

No comments:

Post a Comment