Showing posts with label S-लीला पाठक. Show all posts
Showing posts with label S-लीला पाठक. Show all posts

हवास मज तू हवास,Havas Maj Tu Havas

हवास मज तू हवास सखया

हृदयी माझ्या भाव उसळती
ओठावरती शब्द नाचती
रचावया परि कवितापंक्ती
हवास मज तू हवास रे !

भुलविति, खुलविति रसिक मनाला
सुमनांचा मी संचय केला
गुंफाया परि मोहक माला
हवास मज तू हवास रे !

असे कुंचली, रंगहि असती
धवल फलकही आहे पुढती
रेखाया परि रम्य आकृती
हवास मज तू हवास रे !

स्नेहहि आहे, आहे पणती
मंदिरातल्या मूर्तीपुढती
उजळाया परि जीवनज्योती
हवास मज तू हवास रे !

तो म्हणाला सांग ना,To Mhanala Sang Na,

तो म्हणाला, सांग ना गे मी तुझा ना साजणी
ती म्हणाली, रत्न राया मी तुझ्या रे कोंदणी

तो म्हणाला, प्रेम म्हणजे वेड मजला वाटते
ती म्हणाली, गोड अन् ते ओढ जीवा लाविते

तो म्हणाला, भावनेचे खेळ सारे नाचरे
ती म्हणाली, जीवनाचा भावना आधार रे

तो म्हणाला, प्रीत करिते दो जीवांची एकता
ती म्हणाली, होय ना? मग का अशी ही दूरता?