Showing posts with label उंबरठा (१९८१). Show all posts
Showing posts with label उंबरठा (१९८१). Show all posts

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या,Sunya Sunya Maifilit Majhya

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

चांद मातला मातला,Chand Matala Matala

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ?

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा

वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा मारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू



गंजल्या ओठास माझ्या धार,Ganjalya Othas Majhya Dhar

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !


पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू

तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे !



गगन सदन तेजोमय,Gagan Sadan Tejomay

गगन, सदन तेजोमय
तिमिर हरुन करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वाऱ्यातुन, ताऱ्यातुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय


वासंतिक कुसुमातुन
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपल चरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातिल स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय