पाटीवरती गिरवा अक्षर Pativarati Girava Akshar


पाटीवरती गिरवा अक्षर, अक्षर जोडून शब्‍द करा
अपुले वैभव अपुल्या हाती, हाच आजचा मंत्र खरा
एक अक्षरा अर्थ नसे रे, अनेक मिळुनी अर्थ कळे
एक एकटा मागे पडतो एकजुटीने सर्व मिळे
शिकेल त्याच्या हाती उद्याचे नवीन जीवन घडे
चला जाऊया पुढे

शिकल्यावाचून व्यर्थच सारे, शिक्षण आहे प्रगती रे
अज्ञानाचा मार्ग निकामी, विज्ञानाची चलती रे
नवजीवन हे घेऊन आता सुराज्य येथे आणू या
भेद भावना विसरून आपण एकदिलाने राहूया
क्रांती सरली, शांतीयुगाची नौबत आता झडे
चला जाऊया पुढे

अपुले घर हे अपुले मंदिर, स्वच्‍छ करा रे गाभारा
पवित्र घर अन्‌ पवित्र मन रे हा देवाचा देव्‍हारा
आरोग्याचा पंथ आजचा, व्यायामाची कास धरा
बलशाली रे होऊन आपण बलशाली देशास करा
विकास अपुला साधायाचा मार्ग आपल्याकडे
चला जाऊया पुढे

पुण्‍यभूमी देशात आपल्या नर-रत्‍नांच्या खाणी रे
शूर शिवाजी इथे जन्‍मला अन्‌ झाशीची राणी रे
परकियांशी लढता लढता कितीक कामी आले रे
स्वातंत्र्याची ज्‍योत राखण्या किती हुतात्‍मे झाले रे
भवितव्याला साक्ष सांगण्या पुण्य आपुले खडे
चला जाऊया पुढे

Lyrics - Jayant Marathe  जयंत मराठे
Music - Sudheer Phadake  सुधीर फडके
Singer - Sudheer Phadake  सुधीर फडके, Suman Kalyanpurkar सुमन कल्याणपूर
Movie - Majhi Aai माझी आई

No comments:

Post a Comment