वहिनी माझी हसली ग,Vahini Majhi Hasali Ga

वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली
आजवरी जी दादावरती उगाच होती रुसली !

वहिनी हसता कणकण हासे
भवति सांडले सोनकवडसे
घरदाराला फुटले हासू, नवीन शोभा दिसली !

वहिनी हसता हसले अंगण
अंगणातले अन्‌ वृंदावन
वहिनी पाणी घालु लागता तुळस कशी रसरसली !

वहिनी हसता हसले घुसळण
ताकावर ये लोणी उसळून
खुदुखुदु हसतो भात चुलीवर, उकळी फुटली कसली ?

हासत हासत पदर बांधुनी
भरभर कामे करते वहिनी
तो शकुनाचा हात लागता घरी लक्षुमी दिसली !

हसू वहिनीच्या गाली दिसता
दादा हसला वहिनी हसता
हरवुन गेली होती गंमत फिरुनी आज गवसली !

No comments:

Post a Comment