शिरीषकुमारचा पोवाडा,Shirish Kumaracha Povada

पद्य:
गाऊया तयांचे गान, करुनी बलिदान,
अर्पिले प्राण, जयांनी बंधमुक्त करण्या
निर्मिला स्फूर्तिदायी इतिहास, जी, जी, जी

खानदेशी ! खानदेशी गाव टुमदार, नाव नंदुरबार,
तिथे सुकुमार, शिरिष नावाचा होता एक बाळ,
सोळा वर्षांचा होता लडिवाळ
परि गोऱ्यांना भासला काळ, जी, जी, जी

आली आली ! आली आली मिरवणुक आली
मुले आणि मुली, होती इवलाली,
उत्साहाला भरती आली अनिवार
इंग्रजांना राग आला त्याचा फार
हुकुम दिला करण्या गोळीबार, जी, जी, जी

गद्य :
पोलीस कृष्ण हृदयाचे, सैतान मनामध्ये नाचे.
सरसावीत बंदुका येती, शिरिषास पकडिले हाती.

तो शिरिष !
तो शिरिष पडला खाली, परी हासत होता गाली.
पोलीस बोलला त्याला, घे पाण्याचा एक कटोरा.

परी शिरिष !
परी शिरिष बोलला त्याला, तू देशद्रोही झाला;
शिवणार न तव पाण्याला.
हे असे ! हे असे बोलता बाळ, संतापून गेला काळ.

आणि मग :

पद्य :
मृत्यूने फूल उचलले मृदुल कोवळे;
जयाला बळे, तुडविले पायी राक्षसांनी,
क्रुर त्या दुष्ट पोलिसांनी,
देशाचे शत्रू बेईमानी हो, जी, जी, जी

धन्य धन्य शिरिषकुमार, जाहला अमर;
शूर आणि वीर, पोवाडा त्याचा स्फूर्तिदायी,
बोध घ्या ह्याच्यामधुनी काही
बिदागी हीच आम्हा भाई हो, जी, जी, जी

No comments:

Post a Comment