सरयू - तीरावरी अयोध्या,Sarayu Tiravari Ayodhya

सरयू - तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी

घराघरावर रत्‍नतोरणें
अवती भंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी

स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल - दीपक
नृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी

तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी

शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी

राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य - धनाचें ?
कल्पतरूला फूल नसे कां, वसंत सरला तरी

No comments:

Post a Comment