योग्य समयिं जागविलें,Yogya Samayi Jagavile

योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला

पाप्याप्रति आत्मघात
दुष्कर्त्म्या नरकपात
अटळचि जो नियतीनें नियम योजिला

तव मानसिं आत्मगर्व
विषमय तव आयु सर्व
बोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला

विभिषणकृत सत्यकथन
अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला

मंदोदरि विनवी नित
हित गमलें तुजसि अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला

पाहुनिया देश समय
पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधीं तूं न घातला

मनिं आला तो निर्णय
ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला

प्रिय तितकें ऐकलेंस
अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला

उपदेशा हा न समय
लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला

बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्वीला

सहज वध्य मजसि इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र !
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला

वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला

No comments:

Post a Comment