येणे-जाणे का हो सोडले,Yene Jane Ka Ho Sodale

येणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते

सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
मानिती मला मामंजी, मानतो गाव
चालते खालती बघुन जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते

नऊवार नेसते निसून अंगभर चोळी
तुळशीस घालते पाणी उठून येरवाळी
तुकोबाची गाथा वाचते फावल्या वेळी
रात्रीस होई उलघाल, आसू ढाळते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते

ध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा
ओसाड जुने देऊळ, पांढरा चाफा
तुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते



No comments:

Post a Comment