रघुवरा बोलत कां नाहीं,Raghuvara Bolat Ka Nahi

काय ऐकतें ? काय पाहतें ? काय अवस्था ही ?
रघुवरा, बोलत कां नाहीं ?

जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें ?
दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई ?

ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं ?
अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली ?
धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं ?

ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें ?
गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्न दिशा दाही ?

सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु ?
श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधीं पाहूं ?
नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही

विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सखया !
पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
ऐकलेंत का ? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही

रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी
परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही ?

अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं ?
काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं ?
जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही ?

हे लंकेशा, ज्या शस्त्रानें मारविलें नाथां
घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
रामामागें तरी जाउं दे अंतीं वैदेही

No comments:

Post a Comment